
आत्महत्या नव्हे तो खूनच, शवविच्छेदनातून आले समोर; दिराने केला भावजयचा खून
दिनेश जाधव : कल्याण
भावजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दिराचा बनाव पोलीस तपासात समोर आला असून संपत्तीच्या वादातून दिराने खून केल्याची घटना टिटवाळा नजीक असलेल्या उंभरणी गावात घडली आहे. दरम्यान दिराला कल्याण तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी सुरेश त्र्यंबक वाघे असे अटक केलेल्या दिराचे नाव आहे. तर धृपदा जयराम वाघे, (वय ४० वर्षे) असे मृतक भावजयचे नाव आहे. कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंभारणी गावातील पाण्याच्या टाकीजवळ ६ फेबुवारी रोजी सकाळच्या सुमारास एका ४० वर्षीय महिलेने तिच्या राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या घटनेचा तपास सुरु केला होता. त्यातच या महिलेने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याची कुजबुज परिसरातील नागरिकांमध्ये सुरु असल्याचे समजल्यानंतर या प्रकरणी पोलिसांना सखोल चौकशी सुरु केली. शिवाय शवविच्छेदन अहवालात तिची गळा आवळून खून झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार दिराला अटक करण्यात आली असून त्याला १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. याविषयी अधिक तपास टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी आणि टिटवाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत.
मृतकच्या बहिणीमुळे खुनाचे कारण आले पुढे
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांना तपासाचे चक्रे वेगाने फिरवत नातेवाईकांची चौकशी सुरु केली. त्यावेळी मृतक महिलेची बहीण आशा वाघे हिचेकडून पोलिसांना माहिती मिळावी कि, मृत धृपदा व तिचा दिर सुरेश त्र्यंबक वाघे यांच्यात जमीन- जागेच्या पैशाचे करणावरून वाद असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दिर सुरेशला ताब्यात घेऊन त्याचेकडे सखोल विचारपूस केली असता त्याने जागा- जमीनचे पैशाचे वादातून त्याच्या भावाची पत्नी धृपदा हिचा गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर पोलिसांनी आरोपीला काल सायंकाळी अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विजय सुर्वे करीत आहेत.