
पिस्तूलमधून हवेत गोळीबार करणाऱ्या तस्कराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 2 पिस्टलसह 6 काडतुस हस्तगत
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण : एक पिस्तूल तस्कर कल्याणच्या काळा तलाव परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. त्यातच काही नागरीकांनी काळा तलाव परिसरात एका टपरी समोर हवेत गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी धाव घेत या तस्कराला अटक केली. दुसरीकडे गोळीबाराचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. गणेश राजवंशी असे अटक तस्कराचे नाव असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक देशी पिस्टलसह ६ काडतुस हस्तगत केले आहेत.
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना शुक्रवारच्या रात्रीच्या सुमारास एक पिस्तूल विकणारा तस्कर कल्याणमधील काळा तलाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने, पोलिस निरिक्षक प्रदीप पाटील यांनी पोलिसांची दोन पथक तयार केली. पोलीस कल्याण पश्चिम काळा तलाव परिसरात गस्त घालत या तस्कराच्या मागावर होते. याच दरम्यान एका व्यक्तीने काळा तलाव परिसरात असलेल्या एका टपरी समोर हवेत गोळीबार केल्याची माहिती काही नागरीकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ काळा तलाव परिसरात धाव घेतली गोळीबार करणाऱ्याला जागीच अटक केली.
तस्कर गणेश राजवंशी हा नवी मुंबई घणसोली परिसरात राहतो. त्याने केलेल्या गोळीबाराचा व्हीडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गोळीबारा दरम्यान काही लोक त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते लोक कोण होते. ते कुठे गेले याचा शोध पोलीस घेत आहेत. गणेशकडून दोन पिस्तूल, ६ जिवंत काडतुस, दुचाकी हस्तगत केले आहे. गणेश विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याने हे पिस्तुल कुठून व कुणाला विकण्यासाठी आणले होते याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती कल्याण एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली.