करणी बाधा काढण्याच्या नावाखाली 32.15 लाखांचा गंडा

करणी बाधा काढण्याच्या नावाखाली 32.15 लाखांचा गंडा

मांत्रिक बाबाला जळगावातून बेड्या

दोन दिवसांची पोलिस कोठडी

दिनेश जाधव : डोंबिवली

कळव्यात राहणाऱ्या एका महिलेने डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या धक्कादायक तक्रारीनुसार जळगावच्या भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातला आहे. या बाबाला रामनगर पोलिसांनी जळगावातून अटक केली असून कल्याण कोर्टाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात कळव्यातल्या खारीगाव येथिल बाली रेसिडेन्सीत राहणाऱ्या प्रियांका योगेश राणे (33) या गृहिणीने डोंबिवली (रामनगर) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातल्या भडगावातील गंजेवाडा-शनि चौकात राहणारा पवन पाटील नामक इसमाच्या विरोधात भादंवि कलम 420, 406, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013 चे कलम 2 (1), (ख), 3 (1), (2) अन्वये गुन्हा दाखल केला.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर 2019 पासून आजतागायत पवन बापुराव पाटील (28) या जळगाव जिल्ह्यातील गंजेवाड्यात राहणाऱ्या भोंदूबाबाने तक्रारदार प्रियांका राणे यांच्यासह डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडला असलेल्या ओम साई सोसायटीत राहणाऱ्या आईची फसवणूक केली. प्रियांका यांच्यासह त्यांचा भाऊ आणि आईला त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले. साऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकु व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चांदीची प्रतिमा काढून दाखवली. तसेच या बाबाने कुणीतरी करणी केल्याची भीती घातली. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे सांगून या बाबाने आपल्या व आईचे खात्यामधून वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामध्ये 31 लाख 6 हजार 874 रूपये इतके पैसे ऑनलाईनद्वारे ट्रान्स्फर करवून घेतले. तसेच आपल्याकडून 1 लाख 9 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. अशाप्रकारे या पवन पाटील याने 32 लाख 15 हजार 874 रुपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रियांका राणे यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे.
करणी, भूत-प्रेतबाधा काढण्याच्या नावाखाली इतका पैसा उकळणारा हा भोंदूबाबा आहे तरी कोण ? त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गंडा घालण्याचे धाडस कसे केले ? अशाप्रकारे आणखी कित्ती अंधश्रद्धाळुंना या बाबाने गंडा घातला ? आदी प्रश्नांची उकल त्याच्या चौकशीनंतर होणार आहे. या प्रकरणी वपोनि सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुरेश सरडे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: