
फॅशन डिझाईनर बनला बाईक चोर
मानपाडा पोलिसांनी यूसूफ खान नावाच्या फॅशन डिझाईनरला केली अटक
दिनेश जाधव : डोंबिवली
लोक डाऊन मुळे बेरोजगार झालेल्या फॅशन डिझायनर ने बाईक चोरीचा व्यवसाय सुरू केल्याची घटना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी उघड केली. धक्कादायक म्हणजे यूसूफ खान या फॅशन डिझाईनरने चोरीच्या चार बाईक ओएलएक्सच्या माध्यमातून बनावटी कागदपत्र तयार करून आरटीओला फसवले आहे. या चोरट्याचा मुसक्या मानपाडा पोलिसांनी आवळल्या आहेत.
पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी चोरटय़ांच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक बाईक चोरीचा तपास करीत होते. याच दरम्यान एक चोरी गेलेल्या बाईकचे चलान कापल्याचा मेसेज एका बाईक मालकाच्या फोनवर गेला.
त्या व्यक्तीने तात्काळ याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सदर बाईक ही पुण्याचा एक व्यक्ती वापरत होता. जेव्हा पोलिसांच पथक त्या व्यक्तीकडे गेले त्याने सांगितले रितसर कागदपत्रे तयार करुन ही बाईक ओएलएक्सच्या माध्यमातून विकत घेतली आहे.
या व्यक्तिला समीर शेख नावाच्या व्यक्तीने बाईक विकल्याचे उघड झाले.मात्र पोलिस तपासात समीर शेख नावाचा व्यक्तीच अस्तित्वात नसल्याचे उघड झाले आहे. या मागे असणा:या व्यक्ती यूसूफ खानला पोलिसांनी शोधून काढले. यूसूफ खान हा डोंबिवली येथील पलावा सिटीत राहणारा आहे. तो फॅशन डिझाईनर आहे. लॉकडाऊनमध्ये त्याला काम नसल्याने तो बेरोजगार होता. त्याने चोरी करण्यास सुरुवात केली होती. यूसूफ खानला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.