
अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार; 3 नराधमांना बेड्या
दिनेश जाधव : कल्याण
अंबरनाथ शहरात नवर्षलाच कंपनीत लेबर पुरविण्याच्या वादातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याच्या पाठोपाठ अंबरनाथ पूर्वेत 21वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 3 नराधमांविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी तिन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहे. हनुमान हिलम, विश्वास, आणि जाबिर, असे अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत.
पीडित तरुणी अंबरनाथ पूर्वेत राहते. काल रात्रीच्या सुमारास पीडित तरूणीला नराधमापैकी तिच्या एका मित्राने तिला बोलवले होते. त्यांनतर जांभवली पाडा भागातील एका निर्जनस्थळी असलेल्या झोपडीत नेऊन बियरची बाटली फोडून त्याच्या धारधार काचेने ठार मारण्याची धमकी देऊन तिन्ही नराधमांनी अळीपाळीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. घटनेच्या वेळीही पीडितने या नराधमांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र नराधमांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यांनतर पीडित तरुणीला घटनास्थळी सोडून तिन्ही नराधमांनी पळ काढला होता.
दरम्यान पीडित तरुणीने तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती घरच्याना दिल्यानंतर नातेवाईकांसह पीडितेने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून त्याच्यावर घडलेल्या अत्याचाराचे कथन केले. तर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून नराधमांचा शोध सुरु केला असता आज पहाटेच्या तिन्ही नराधमांना अटक केली. आज या तिन्ही नराधमांना न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.