
पादचारी महिलेची चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला महिलेने काही नागरिकांच्या मदतीने पकडले
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील घटना
दिनेश जाधव : कल्याण
पादचारी महिलेची चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला महिलेने काही नागरिकांच्या मदतीने पकडून रेलवे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली. उमाशंकर पांडे असे या चोरट्याच नाव असून कल्याण जीआरपी पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि लूटच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः रेल्वे परिसरात गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. चोरी आणि चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या डझनभर चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यानंतर ही चोऱ्यांच सत्र सुरूच आहेत. अशीच एक घटना काल दुपारी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात घडली.
महिलेची चैन खेचून पळणाऱ्या चोरट्याला बेड्या
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या वॉलसमा जॉर्ज ही महिला काल दुपारच्या सुमारास रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून जात असताना एका चोरट्याने तिचा पाठलाग केला. संधी साधून जॉर्ज यांच्या गळ्यातील महागडी चैन हिसकावून चोरट्याने पळ काढला. जॉर्ज यांनी आरडा ओरड करत चोरट्याचा पाठलाग सुरु केला. काही नागरिकांच्या मदतीने या चोरट्याला पकडून कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल केला आहे. उमाशंकर पांडे असं या चोरट्याचं नाव आहे. याबाबत कल्याण जीआरपीच्या पोलीस अधिकारी अर्चना दुसाने यांनी पांडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या विरोधात याआधी देखील एक गुन्हा दाखल आहे. याआधी त्याने आणखी चोऱ्या केल्यात का याचा तपास पोलीस करत आहेत.