
नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे सलग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन ऑल आऊट राबवून मद्यपी वाहनचालकांसह दारुबंदीचे गुन्हे दाखल
प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदुरबार)
कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश रहावा यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे सलग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन ऑल आऊट राबवून मद्यपी वाहनचालकांसह दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच १८७ नॉन बेलेबल व १३१ बेलेबल वारंटची बजावणी करण्यात आली. यासह मद्य, गुटखा पकडण्याची कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबार पोलिसांच्या या कामगिरीने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
सलग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यासाठी नंदुरबार पोलिस दलातील ४४ अधिकारी व २८७ अंमलदार नेमण्यात आले होते. पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधिक्षक विजय पवार यांनी स्वत: पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या. पोलिस उपअधिक्षक विश्वास वळवी, उपाविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, एलसीबीची पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपापल्या पथकाचे नेतृत्व केले. ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान ३६ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करीत त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच चोरी करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या ११ संशयितांविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ संशयितांनी मिळून आलेल्या मालमत्तेबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. याशिवाय दारुबंदीचे २५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १ लाख २३ हजार ७३५ रुपयांची देशी-विदेशी दारु व बिअर व ४० हजार रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले आहे. २३ जुगाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या पप्पू उर्फ फारुखखान जहीरखान कुरेशी हा घरी आढळून आल्याने त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.