
गोरंबाचा मालपाडा येथे शेतीच्या हिस्से वाटणीवरुन आई-मुलीस मारहाण
प्रतिनिधी – उमेश पांढारकर ( नंदुरबार )
नंदुरबार – धडगाव तालुक्यातील गोरंबाचा मालपाडा येथे शेतीच्या हिस्से वाटणीवरुन आई-मुलीस मारहाण केल्याने चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील गोरंबाचा मालपाडा येथील मोगराबाई टिला पराडके व अशोक सामा पराडके यांच्यात शेतीच्या हिस्से वाटणीवरुन वाद होता. या वादातून मोगराबाई पराडके यांना अशोक पराडके याने दगडाने डोळ्याजवळ ठोसा मारुन दुखापत केली. तसेच मोगराबाई पराडके व मुलगी अस्मिता टिला पराडके यांना सामा जेरमा पराडके, अनिल सामा पराडके, रमिला अशोक पराडके यांनी शिवीगाळ करीत काठी, हाताबुक्यांनी मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली व घराचा कुड तोडून नुकसान केले. याबाबत मोगराबाई पराडके यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय मनोरे करीत आहेत.