
अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदूरबार)
नंदुरबार – धडगाव तालुक्यात रोषमाळ येथून नंदुरबारकडे परतणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पोशि निलेश माणिक पावरा (३१) रा भोगवाडे खुदे पो धनाजे ता. धडगाव, (हमु जुनी पोलीस वसाहत नंदुरबार) हे दि . १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास रोषमाळ येथून नंदुरबारकडे त्यांची पल्सर मोटरसायकल (एम.एच .३ ९ , टी . ४ ९९ २) ने येत असताना धडगाव – तळोदा रस्त्यावरील रोझवा पुनर्वसन गावाजवळ तळोदा कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात निलेश पावरा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जिरुबाई माणिक पावरा रा. भोगवाडे खुदे पो. धनाजे ता. धडगाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनी अमितकुमार बागुल करीत आहेत.