
- ऑनलाईन योग शिबिर उत्साहात संपन्न
देहूरोड ता 28 मे – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, मंथन फाउंडेशन पुणे आणि निरामय योग प्रसार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने किवळे, रावेत येथे सात दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात स्वतःच्या आरोग्यसाठी योग साधनेची गरज लक्षात घेऊन त्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश होता त्या अनुषंगाने “श्वसनरोग प्रतिकारशक्ती वर्धक योग शिबीर” हा प्रमुख विषय घेऊन ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन, मार्गदर्शन, प्रात्यक्षिक सादरीकरण योग प्रशिक्षक व बाल मानसशास्त्र शिक्षिका स्नेहल विपुल डोके व योग प्रशिक्षक ऋषिका भोंडवे यांनी केले.
या शिबिरासाठी ऑनलाईन माध्यमातून पिंपरी चिंचवड परिसरातील एकूण ९० साधकांनी लाभ घेतला. यामध्ये वय वर्ष ८ पासून ते ८० वर्षीय ज्येष्ठ योग साधकांनी सहभाग घेऊन योग साधनेचे धडे घेतले. योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला जात होता यात प्रत्येक आसनाचे फायदे, आसन घेण्याची पद्धत आदीची माहिती देण्यात आली व वयक्तिक रित्या योग अभ्यास करून घेण्यात आला. या सात दिवसीय योग अभ्यासातून सर्वांमध्ये नव चेतना निर्माण झाले. आपला श्वास व आपले आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग साधना अत्यंत गरजेची आहे या भावना साधकांनी व्यक्त केल्या.
शिबिरात रोग प्रतिकारशक्ति वाढवण्यास उपयुक्त विविध सूक्ष्मयोग आसानांचे, प्राणायामांचे तसेच जलनेती शुद्धीक्रियेचे कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले. कोणत्याही व्यक्तीला सहज करता येणाऱ्या खांघाच्या हालचाली, कंबरेच्या हालचाली, हस्तउत्तानासन, हस्तपादासन, एकहस्त कटीचक्रासन, अर्धचक्रासन, वज्रासन , शशांकासन, अद्वासन, तिर्थक भुजंगासन, सरल मत्स्यासन, शवासन, प्रणायामात- सूर्यानुलोम-विलोम , सुर्यभेदन, भस्रिका, उज्जयी प्राणायाम, दीर्घश्वसन, जलनेती, तसेच इतर शरीर शुद्धिक्रिया इत्यादि कृति करुन दाखवून करून घेण्यात आले.
मंथन फाउंडेशनच्या केंद्रप्रमुख व योग मार्गदर्शिका विद्या आहेरकर, डॉ. निता पद्मावत, डॉ.अर्चना मुदखेडकर, डॉ.मिनाक्षी रेड्डी, सविता स्वामी, राम काकडे, डॉ.सतीश बापट तसेच संचालिका व समाजसेविका आशा भट्ट, आदीचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.