
पोलीस महानगर : परवेज शेख
पुणे, दि. ८ मे : पुणे परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने जेरबंद केले आहे. त्याच्याजवळून ४,०१,२३५/- रु.चा सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जयपालसिंग ऊर्फ मोन्यासिंग टाक (वय-२० वर्षे, रा. गोसावी वस्ती, बिराजदारनगर, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील तो पाहिजे आरोपी होता.
यापूर्वी या गुन्ह्यात अमरसिंग जगरसिंग टाक या आरोपीस अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील सॅन्ट्रो कार, तीन दुचाकी व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६,४४,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या गुन्ह्यातील दुसरा आरोपी जयपालसिंग याचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस नाईक मुंढे यांना जयपालसिंग हा सोलापूर येथे जाण्यासाठी शेवाळवाडी जकातनाका येथे येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने सापळा रचून जयपालसिंग यास दु. १२.०५ वा. ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने वरील गुन्हा त्याचा साथीदार अमरसिंग जगरसिंग टाक याच्यासह केल्याचे सांगितले.
जयपालसिंग याच्याकडे पोलीस अधिक तपास करीत असताना त्याने त्याच्या साथीदारासह चातुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये १, लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये ३, लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये २ असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून नमूद गुन्ह्यामधील ७.५० तोळे सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण ४,०१,२३५/- रु. किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अशाप्रकारे लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपी अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून १०,४५,२३५/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे शहर मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहा. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे-२ चे सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, अंमलदार नितीन मुंढे, मच्छिंद्र वाळके, ऋषिकेश टिळेकर, राहुल माने, प्रतिक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे व संजय देशमुख यांनी केली आहे.