
पोलीस महानगर : परवेज शेख
पिंपरी चिंचवड, दि. २७ एप्रिल : वाहतुकीच्या नियमांचा भंग करीत असलेल्या रिक्षाचालकावर कारवाई करीत असताना एका महिला वाहतूक पोलिसाला गचांडी पकडून मारहाण करण्यात आली. हा प्रकार पिंपरी येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात सोमवार दि. २६ एप्रिल रोजी ८.४५ वा. च्या दरम्यान घडला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
प्रल्हाद रामभाऊ कांबळे (वय-५१ वर्षे, रा. कामगार भवनशेजारी, पिंपरी) व रिक्षाचालक अहनद मौल शेख (वय-३३ वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत संबंधित महिला वाहतूक पोलिसाने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पोलीस या दि. २६ एप्रिलला सकाळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करीत होत्या. त्यावेळी आरोपी अहनद शेख हा नेहरूनगर येथून आंबेडकर चौकात विरुद्ध दिशेने रिक्षा चालवत आला. म्हणून फिर्यादी यांनी त्याला थांबवून त्याच्या ड्रायव्हिंग लायसेन्स व रिक्षाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. तसेच त्याला त्याचे नाव पत्ता विचारला.
परंतु आरोपी रिक्षाचालकाने कागदपत्रे दिली नाहीत व नाव पत्ताही सांगितला नाही. म्हणून फिर्यादींनी रिक्षाचालकास पिंपरी वाहतूक विभागाच्या कार्यालयात आणले. तेथे त्याच्यावर कारवाई करीत असताना आरोपी प्रल्हाद कांबळे तेथे आला व त्याने फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. तसेच त्याने ‘आत्तापर्यंत तुम्ही किती वाहनांवर कारवाई केली, याची माहिती मला तात्काळ द्या. तुम्ही हे कशासाठी करता, हे मला चांगले माहीत आहे. पोलीस लाचार आहेत. आम्हाला इथे कशासाठी आणले, ते मला माहीत आहे.’ असे म्हणत आरोपी प्रल्हाद कांबळे याने ‘तू जा रे इथून ही काय करते मी पाहतो’ असे म्हणून आरोपी रिक्षाचालकास तेथून पळून लावले.
रिक्षाचालक पळून जात असताना फिर्यादी त्यास पकडण्यासाठी धावल्या असता आरोपी प्रल्हाद याने फिर्यादींचा हात पकडून त्यांना ओढले व फिर्यादींची गचांडी पकडून सर्वांसमोर त्यांच्या दोन थोबाडीत मारल्या. फिर्यादींशी गैरवर्तन करून फिर्यादींचा विनयभंग केला आहे. तसेच वाहतूक कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर उभे राहून फिर्यादींना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याबाबत वरील दोन्ही आरोपींविरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत