
पोलीस महानगर : परवेज शेख
पिंपरी चिंचवड, दि. १८ एप्रिल : आकुर्डी येथे क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्याची घटना घडली आहे. ही घटना दि. १६ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वा.च्या सुमारास घडली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तीन आरोपींना अटक केली आहे.
१) श्रीपाद मोहन जाधव (वय-२२ वर्षे, रा. पंचतारानगर, आकुर्डी, पुणे) २) अमित रामपाल अगरवाल (वय-३५ वर्षे, रा. लोकमान्य हॉस्पिटलसमोर, निगडी, पुणे) ३) नितीन रामदास काळे (वय-२१ वर्षे, रा. पंचतारानगर, आकुर्डी, पुणे) ४) किशोर रेहाल उर्फ किशोर भाई (रा. चेंबूर, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पिंपरी चिंचवडचे गुन्हे शाखा गुंडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक विजय दत्तात्रय तेलेवार यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा उद्देश्याने शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करून तसेच क्रिकेटवर घेतल्या जाणाऱ्या बेिटंगला भारतात कायद्याने बंदी असूनसुद्धा वरील आरोपी जाधव, अगरवाल व काळे हे आरोपी रेहाल याच्या मदतीने ऑनलाईन सट्टा जुगार खेळत होते. सध्या चालू असलेल्या आयपीएल २०-२० मधील पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या क्रिकेटच्या सामन्यावर लोटस ऑनलाईन सट्टा खेळताना व खेळविताना पोलिसांनी वरील आरोपींना पकडले. त्यावेळी पोलीस नाईक तेलेवार यांना व त्यांच्या बरोबर असलेल्या पोलीस अंमलदार यांना आरोपींनी धक्काबुक्की केली. तसेच गडबड गोंधळ व दहशत निर्माण करून त्यांना मुक्का मार दिला व ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.
पुढील तपास निगडी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.