
पुणे, दि. ११ एप्रिल : पुणे शहरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणारे आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पृथ्वीराज संदीप मुळीक (वय-२२ वर्षे, रा. साईप्रसाद सोसायटी, दत्तनगर, पुणे) असे अटक केलेली आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून एक रेमडेसिव्हीर इंजेक्शनची बाटली जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक ढगे यांना कात्रज येथील दत्तनगरमध्ये वरील आरोपी कोविड-१९ या आजारावर लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची बाटली स्वतःच्या फायद्यासाठी अधिक किमतीमध्ये विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाचे सपोनि जुबेर मुजावर यांनी अन्न व औषध प्रशासनचे औषध निरीक्षक अतिश शिवाजीराव सरकाळे व विवेक पांडुरंग खेडकर यांना वरील ठिकाणी नेले. तसेच पोलीस नाईक ढगे हे बनावट गिऱ्हाईक बनून दत्तनगर येथील साई प्रसाद हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन थांबले. तिथे वरील आरोपी थांबलेला त्यांना दिसला. त्यास बनावट गिऱ्हाईक बनलेल्या पोलीस नाईक ढगे यांनी कोविड-१९ आजारावर लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची बॉटल पाहिजे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याला रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या बॉटलसह काळाबाजाराने विक्री करताना पकडले.
रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या होणाऱ्या काळाबाजार प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याकरिता सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची १० पथके कार्यान्वित झाली आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने, गुन्हे शाखेचे मा. पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस अंमलदार निलेश शिवतरे, धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, अतुल मेंगे, मॅगी जाधव, गणेश ढगे, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळप व चेतन होळकर तसेच अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.