
पोलीस महानगर : परवेज शेख
भोसरी, दि. ५ एप्रिल : गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्याकरिता गेलेल्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. ही घटना भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे दि. ४ एप्रिलला दु. ३.३० वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१) शाहनवाज नजीर बेग (वय-४१) २) शौकत नजीर बेग (वय-४२, दोघेही रा. सुंदर कॉलोनी, थेरगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सावंत व पोलीस शिपाई सुमित देवकर हे भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करीत होते. तपासकामी ते भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाच्या जवळ गावजत्रा मैदान या ठिकाणी वरील आरोपींना ताब्यात घेण्याकरिता गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलीस शिपाई सावंत व देवकर यांना अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये ते दोघेही जखमी झाले आहेत. तसेच आरोपींनी फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.
पुढील तपास भोसरी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक अनगळ करीत आहेत.