
भोर-शिरवळ रोड येथून सराईत आरोपींकडून पिस्तुल व काडतुस जप्त : एलसीबी पथकाची कारवाई
पुणे : परवेज शेख
भोर पोलीस स्टेशनचे हद्दीत भोर-शिरवळ रोड मौजे वडगाव डाळ, सायमाळ ता.भोर जि.पुणे येथे सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तुल व एक जिवंत काडतूस जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणूकीचे अनुषंगाने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपी यांना पकडणेकामी विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधवर, राजू चंदनशिव, चंद्रकांत झेंडे, रवि शिनगारे, महेश गायकवाड, निलेश कदम, अमोल शेडगे यांचे पथक नेमण्यात आलेले होते.
दिनांक १९ ऑक्टोबर २०१९ रोजी सदर पथक भोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सदर पथकास भोर-शिरवळ रोड, वडगाव डाळ, सायमाळ ता.भोर जि.पुणे येथे पासलकर याचे कमरेला पिस्टल, अंगात पिवळा राखाडी शर्ट व निळी जीन पॅट असा पेहराव असल्याची बातमी मिळाल्याने सदर पोलीस पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा लावला. पोलीसांना पाहून पळून जाताना दिपक उर्फ मोगल्या बाळासाहेब पासलकर वय २७ वर्षे रा.कुरण बु”, वरचीवाडी ता.वेल्हा जि.पुणे यास पाठलाग करून ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदा, बिगर परवाना बाळगलेले एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस किं.रु.५०,४००/- चे हस्तगत केलेले आहे.
आरोपीविरुद्ध भोर पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीस पुढील कारवाईकामी भोर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.
आरोपीने पिस्तुल नक्की कोणत्या कारणांसाठी बाळगले होते? याबाबतचा अधिक तपास भोर पोलीस स्टेशन करीत आहे.