
राडो, रोलेक्स, CALVIN KLEIN, स्विस, फास्ट ट्रॅक या आणि अशा नामांकित कंपन्यांची १ कोटी रुपये किंमतीची बनावट घड्याळं मुंबई पोलिसांनी केली जप्त
राडो, रोलेक्स, CALVIN KLEIN, स्विस, फास्ट ट्रॅक या आणि अशा नामांकित कंपन्यांची १ कोटी रुपये किंमतीची बनावट घड्याळं मुंबई पोलिसांनी जप्त केली आहेत. १७ सप्टेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखेने नामांकित कंपन्यांची बनावट घड्याळं, घड्याळांचे स्पेअर पार्ट, साहित्य अशी एकूण २० लाखांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणी ३ आरोपींना अटकही करण्यात आली.
अटक आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीला पुरवण्यात येते त्याबाबत अधिक माहितीच्या अनुषंगाने सारंग स्ट्रीट, पायधुनी, मुंबई येथील ऑफिसमध्ये छापा टाकला आणि केल्विन क्लिन, फास्ट ट्रॅक, फॉसिल्स, रोलेक्स, राडो या आणि इतर नामांकित कंपन्यांची ५ हजार २८१ घड्याळं जप्त केली. तसेच या प्रकरणी ऑफिस मालकालाही अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे असंही पोलिसांनी सांगितलं.
तपासादरम्यान असं निष्पन्न झालं आहे की ही घड्याळं बनावट आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करुन मुंबई, महाराष्ट्र आणि इतर राज्यात ती विकली जातात. ही कुठून आयात केली जातात? या सगळ्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त भोपळे, प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत पोलीस निरीक्षक नितीन पाटील, मोहसीन पठाण हे सगळे कारवाईत सहभागी झाले.