सायन कोळीवाड्यात एसआरए मेगा समस्या निराकरण शिबिर; ५०० हून अधिक रहिवाशांच्या तक्रारींवर सुनावणी
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : तमिल सेलवन यांच्या पुढाकारातून सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात रविवारी ‘एसआरए मेगा प्रॉब्लेम रिझोल्यूशन कॅम्प’चे आयोजन करण्यात आले. जी.टी.बी. नगर येथील गुरुनानक कॉलेजमध्ये पार पडलेल्या या शिबिरात ५०० हून अधिक एसआरए लाभार्थींनी सहभाग घेत विविध समस्या मांडल्या.
एसआरए प्रकल्पांतील रखडलेली कामे, थकीत भाडे, फ्लॅट अलॉटमेंट, वारस प्रमाणपत्र, बायोमेट्रिक अडचणी, पात्रता वाद तसेच काही प्रकल्पांमध्ये बिल्डर बदलण्याची मागणी अशा विविध प्रश्नांवर या शिबिरात सुनावणी करण्यात आली. अनेक रहिवाशांनी बिल्डरांकडून वेळेवर भाडे न मिळणे आणि काही इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याची तक्रार केली.
या शिबिरासाठी एसआरए विभागाचे सुमारे ५० वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावरील तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. काही लाभार्थींना यावेळी एसआरए घरांच्या चाव्या आणि अलॉटमेंट पत्रांचे वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमाला रवि राजा, स्थानिक नगरसेविका, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.