इबोला संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सतर्कता; पीपीई किटमधील कर्मचाऱ्यांकडून तपासणी
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने इबोला संसर्गाबाबत आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर देशभरात सतर्कता वाढविण्यात आली असून पुणे विमानतळ येथेही विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरोग्य तपासणी आणि निगराणी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
बँकॉक आणि दुबईहून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी केली जात असून विमानातच प्रवाशांना सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म वितरित करण्यात येत आहेत. संशयित लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना तातडीने विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उच्च जोखीम असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारांसाठी नायडू रुग्णालय येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
विमानतळावरील कर्मचाऱ्यांना पीपीई किटचा वापर, इबोला तपासणी आणि आपत्कालीन प्रतिसाद याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वतंत्र कक्षात PPE किट परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरू असून सध्या पुणे विमानतळावर इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, इबोला हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग असून त्याचा प्रथम उद्रेक १९७६ मध्ये आफ्रिकेत झाला होता. संक्रमित व्यक्तीच्या रक्त, घाम, लाळ, मूत्र, विष्ठा, उलटी, गर्भजल तसेच इतर शारीरिक द्रव्यांच्या थेट संपर्कातून हा संसर्ग पसरतो. ताप, डोकेदुखी, घशाला खवखव, उलटी आणि जुलाब ही सुरुवातीची लक्षणे असून गंभीर अवस्थेत रक्तस्त्राव आणि अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
इबोलाचा प्रसार हवेतून होत नसून केवळ संक्रमित शारीरिक द्रव्यांच्या संपर्कातूनच होतो. त्यामुळे संसर्ग नियंत्रण, विलगीकरण आणि संशयित रुग्णांपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.