दुर्बल घटकांसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या लताताई सकट यांची ६० वी जयंती; संघर्षमय कार्याला अभिवादन

दुर्बल घटकांसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या लताताई सकट यांची ६० वी जयंती; संघर्षमय कार्याला अभिवादन

रवि निषाद / मुंबई

मुंबई : दुर्बल, निराधार आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या दिवंगत लताताई सकट यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याची आठवण करत सामाजिक न्यायासाठी दिलेल्या लढ्याला प्रेरणादायी ठरविण्यात आले.

२४ मे १९६६ रोजी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात लताताई सकट यांचा जन्म झाला. रमाबाई आंबेडकर नगर आणि साठे नगर परिसरात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील दिवंगत विठ्ठलराव साठे हे दलित पँथरचे संस्थापक सदस्य आणि मातंग समाजाचे नेते होते. त्यामुळे बालपणापासूनच त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता.

लताताई सकट यांनी विविध सामाजिक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अन्यायाविरोधातील संघर्षामुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते. १९९२ मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विलासभाऊ रुपवते यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यानंतर महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेची स्थापना करण्यात आली आणि लताताई सकट यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

यानंतर विलासभाऊ रुपवते आणि लताताई सकट यांनी राज्यभर दौरे करत निराधार महिला, विधवा, देवदासी, परित्यक्ता, घरकाम करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, अंध-अपंग, सेक्स वर्कर, दलित आणि आदिवासी घटकांना संघटित केले. त्यांच्या हक्कांसाठी विविध आंदोलने उभारून शासनाचे लक्ष वेधले.

देवदासी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी विशेष लढा उभारला. मुलींना देवाला सोडण्याच्या अमानवी प्रथेविरोधात जनजागृती करत महिलांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचे काम केले. जाती-धर्माचा भेद न करता सर्व समाजातील महिलांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला.

१५ ऑगस्ट २०१० रोजी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या ऐतिहासिक अर्धनग्न मोर्च्याने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली होती. दुर्बल महिलांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या आंदोलनाचे वृत्तांकन केले होते.

या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, पोलिस कारवाई झाली आणि अनेकांना तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र, विलासभाऊ रुपवते आणि लताताई सकट यांनी संघर्षाची भूमिका कायम ठेवली. कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसतानाही त्यांनी संविधानाच्या माध्यमातून न्यायासाठी लढा सुरू ठेवला.

९ फेब्रुवारी २०१२ रोजी लताताई सकट यांचे निधन झाले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २५ जुलै २०१२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते “दिवंगत लताताई सकट पुरस्कार योजना” सुरू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon