टिटवाळ्यातील बेकायदा चाळींवर केडीएमसीचा बुलडोझर; शेकडो कुटुंबे बेघर होण्याच्या उंबरठ्यावर

टिटवाळ्यातील बेकायदा चाळींवर केडीएमसीचा बुलडोझर; शेकडो कुटुंबे बेघर होण्याच्या उंबरठ्यावर

पोलीस महानगर नेटवर्क

टिटवाळा : टिटवाळ्यातील बल्याणी आणि मांडा परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर चाळींवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने मोठी कारवाई करत सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला. अतिक्रमणविरोधी धडक मोहिमेमुळे शेकडो कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वस्त घरांच्या आमिषाला बळी पडून अनेक सर्वसामान्य नागरिकांनी या चाळींमध्ये आपला संसार थाटला होता. मात्र अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी चाळमाफियांबरोबरच महापालिकेतील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करत, त्यांच्या संगनमताशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहू शकत नसल्याचा दावा केला.

दरम्यान, माध्यमांनी घेतलेली दखल, वाढता लोकक्षोभ आणि सरकारी जमिनींवरील अतिक्रमणाबाबत वाढलेल्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिकेने ही कारवाई अधिक वेगाने सुरू केल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने भविष्यातही अतिक्रमणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

या कारवाईमुळे एका बाजूला बेकायदेशीर बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा संदेश प्रशासनाकडून देण्यात येत असला, तरी दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon