डोंबिवली पश्चिमेत वाहनचोरींचा सुळसुळाट; एका दिवसात चार दुचाकी लंपास
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून, अवघ्या एका दिवसात तीन ॲक्टिव्हा स्कूटर आणि एक मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कोपर रेल्वे स्थानक, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरासह विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत सकाळपासून दुपारपर्यंत या वाहनचोरीच्या घटना घडल्या. चोरट्यांनी पार्क केलेल्या दुचाकींवर डल्ला मारत काही मिनिटांत वाहने पसार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
स्थानिक नागरिकांच्या मते, वाहनचोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून बचाव करण्यासाठी मुख्य रस्त्यांऐवजी पश्चिमेकडील अंतर्गत रस्त्यांचा वापर करत आहेत. चोरीनंतर चोरटे माणकोली पूल मार्गे भिवंडीच्या दिशेने पसार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
परिसरात वारंवार घडणाऱ्या वाहनचोरींमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी पार्क करणाऱ्या प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी रात्री आणि पहाटेच्या वेळी गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणेची प्रभावी तपासणी करावी आणि वाहनचोरांच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी चोरीच्या घटनांची नोंद घेत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.