डोंबिवलीत माणुसकीला काळीमा!

डोंबिवलीत माणुसकीला काळीमा!

पैशांच्या हव्यासापोटी बायकोला नवऱ्याचा अजब फरमान; पत्नीला चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यास सांगत अमानुष मारहाण

योगेश पांडे / वार्ताहर 

डोंबिवली – डोंबिवलीत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या पतीवर संसाराची जबाबदारी असते, त्यानेच स्वत:च्या पत्नीला पैशांच्या हव्यासापोटी नरकयातना दिल्या आहेत. घरातील गॅस सिलेंडर आणि दागिने विकूनही भूक न भागलेल्या या नराधम पतीने चक्क स्वतःच्या पत्नीला चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यास सांगत अमानुष मारहाण केली. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून संपूर्ण परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.

पीडित महिलेचा विवाह २ वर्षांपूर्वी यश गुप्ता नावाच्या तरुणाशी झाला होता. लग्नानंतर काही काळ संसार अगदी सुखात आणि सुरळीत सुरू होता. मात्र, हळूहळू यशच्या वागण्यात बदल झाला आणि त्याने पैशांसाठी पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली.पीडित महिलेच्या आईचे आजारपण असो किंवा इतर कौटुंबिक अडचणी, प्रत्येक वेळी यशने पत्नीवर पैसे आणण्यासाठी दबाव टाकला. आपल्या आईकडून पैसे आणून देऊनही यशचा पैशांचा हव्यास काही संपला नाही.

यश गुप्ताने पत्नीला केवळ मानसिक त्रास दिला नाही, तर घराची आर्थिक स्थितीही रसातळाला नेली. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने घरातील मौल्यवान दागिने लांबवले. इतकेच नाही तर घरचा गॅस सिलेंडर देखील तो विकण्यासाठी घेऊन गेला. पत्नीने विरोध केला की तिला घटस्फोटाची धमकी दिली जात असे. पैशांच्या नशेत त्याने पत्नीची सर्व सुखे हिरावून घेतली आणि तिला घरात एकटे पाडले.ही घटना आणखी गंभीर वळणावर पोहोचली जेव्हा यश गुप्ता हा रात्रीच्या सुमारे ३:१५ च्या सुमारास आपल्या हर्षल देढे नावाच्या मित्राला घेऊन पत्नीच्या घरी पोहोचला. मध्यरात्री दरवाजा ठोठावल्याने पीडित महिलेने सुरुवातीला दरवाजा उघडण्यास नकार दिला. मात्र, विनंती केल्यावर तिने दरवाजा उघडला.

घरात प्रवेश करताच या दोघांनी पुन्हा पैशांचा विषय काढला. यावेळी यशने ओलांडलेल्या मर्यादा ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. त्याने पत्नीला धंदा करून पैसे आण अशी घृणास्पद धमकी दिली.पतीने केलेल्या या मागणीला पीडित महिलेने कडाडून विरोध केला. याचा राग येऊन यश आणि त्याचा मित्र हर्षल या दोघांनी मिळून महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पीडित महिलेने धाडस दाखवले आणि तात्काळ पोलिस हेल्पलाइनवर फोन केला. पोलिसांना माहिती दिल्याचे समजताच पकडले जाण्याच्या भीतीने यश गुप्ता आणि हर्षल देढे या दोघांनीही तिथून पळ काढला.

या अमानुष घटनेनंतर पीडित महिलेने मानपाडा पोलिस ठाणे गाठून आपली आपबिती सांगितली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत यश गुप्ता आणि हर्षल देढे या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून मानपाडा पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. ज्या पतीने आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले, त्यानेच पत्नीला नरकयातना दिल्याने महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित महिलेने आता या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon