पुणे पोलिसांचा धक्कादायक प्रकार: प्राचार्यांना खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून ७ लाखांची खंडणी; तिघे कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे : शहरातील पोलीस दलालाच कलंक लावणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्यांच्याकडून सुमारे सात लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५५ वर्षीय प्राचार्यांना गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. अटकेची तसेच सामाजिक बदनामीची भीती निर्माण करून संबंधितांकडून टप्प्याटप्प्याने सुमारे सात लाख रुपये उकळण्यात आले.
हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने चौकशी सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर अजित बडे (पोलीस उपनिरीक्षक), सोनाली हिंगे (दामिनी मार्शल) आणि सुदाम तायडे (पोलीस कर्मचारी) यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.
या तिघांविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.