विठ्ठलवाडी ते कल्याण स्थानकादरम्यान मंगळवारी दुपारी धक्कादायक आणि थरारक प्रकार; एसी लोकलच्या टपावर एक तरुण चढल्याने वाहतूक विस्कळीत
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – विठ्ठलवाडी ते कल्याण स्थानकादरम्यान मंगळवारी दुपारी एक अतिशय धक्कादायक आणि थरारक प्रकार पाहायला मिळाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एसी लोकलच्या टपावर एक तरुण चढल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. हा तरुण मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्याच्या या कृतीमुळे भरदुपारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून दादरच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये हा सर्व प्रकार घडला. दुपारी सुमारे २:०३ वाजता ही लोकल विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान धावत असताना एक तरुण अचानक गाडीच्या छतावर चढला.उन्हाचा तडाखा आणि डोक्यावर असलेल्या हायव्होल्टेज ओव्हरहेड वायरची तमा न बाळगता हा तरुण छतावर बसून राहिल्याने रेल्वे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. विठ्ठलवाडी स्थानकावर पोलिसांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो एकदा खाली उतरून पुन्हा चकवा देऊन छतावर चढला.
विठ्ठलवाडी स्थानकातील प्रयत्नांना यश न आल्याने ही लोकल कल्याण स्थानकाकडे रवाना करण्यात आली. दरम्यानच्या काळात रेल्वेने वीजपुरवठा खंडित करण्याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. दुपारी २:५० वाजताच्या सुमारास गाडी कल्याण स्थानकात पोहोचली. तिथे रेल्वे पोलीस, स्थानकातील कर्मचारी आणि दोन ते तीन हमाल यांनी मिळून मोठ्या शिताफीने या तरुणाला खाली उतरवले. सुमारे ४७ मिनिटांच्या थरारानंतर या तरुणाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात यश आले.
या विचित्र प्रकारामुळे कल्याण स्थानकावर एसी लोकलसह इतर गाड्यांची वाहतूकही काही काळ प्रभावित झाली. दुपारी २:०३ ते २:५० या कालावधीत रेल्वे पोलीस आणि कर्मचारी या तरुणाला खाली उतरवण्याच्या प्रयत्नात असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. भर उन्हात प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास गाडीत आणि प्लॅटफॉर्मवर ताटकळत राहावे लागले. ताब्यात घेतल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या तरुणाची रवानगी पोलीस ठाण्यात केली असून, त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे.
एसी लोकलचे दरवाजे बंद असताना आणि स्थानकांवर कडक बंदोबस्त असतानाही हा तरुण छतावर पोहोचलाच कसा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मनोरुग्ण असल्याने त्याने हे पाऊल उचलले असले, तरी हायव्होल्टेज वायरच्या संपर्कात आला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेने मध्य रेल्वेच्या सुरक्षेबाबत प्रवाशांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सध्या या तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.