औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस; ठाण्यात १.६५ कोटींच्या मद्यसाठ्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस; ठाण्यात १.६५ कोटींच्या मद्यसाठ्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे : औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस तयार करून परराज्यातून गोव्यात निर्मित भारतीय बनावटीचे विदेशी मद्य (IMFL) वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सुमारे १ कोटी ६५ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, तसेच अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. खात्रीलायक माहितीच्या आधारे भरारी पथक क्र. १, ठाणे-१ यांनी मंगळवारी (दि. ५ मे) सायंकाळी आर. सी. पाटील टोल नाका ते माजिवाडा रोड दरम्यान गस्त घालत असताना संशयित कंटेनर अडवला.

एमपी-०९-GG-७९३० क्रमांकाच्या अशोक लेलँड कंपनीच्या सहाचाकी कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेल्या ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’च्या १८० मिलीच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या. एकूण १४५० बॉक्स (१२,५२८ ब.लि.) मद्य जप्त करण्यात आले असून हा साठा गोवा राज्यात निर्मित असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक १०२/२०२६ नोंदवण्यात आला असून कंटेनरसह एकूण १,६५,११,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनचालक पर्गत सिंग कर्तार सिंग आणि अमरीतबिर सिंग हरप्रीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई निरीक्षक एम. पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, एस. आर. मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी. जी. थोरात तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. पुढील तपास अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon