भिवंडीतील पोलीस हवालदाराचा प्रामाणिकपणा; सापडलेले ₹१२,५०० मालकाला परत

भिवंडीतील पोलीस हवालदाराचा प्रामाणिकपणा; सापडलेले ₹१२,५०० मालकाला परत

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी : कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देणारी घटना भिवंडीत घडली आहे. भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष सूर्यवंशी यांनी रस्त्यावर सापडलेली ₹१२,५०० रुपयांची पिशवी प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दि. २२ एप्रिल २०२६ रोजी रात्रीची ड्युटी संपवून घरी जात असताना नारपोली पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर त्यांना पैशांची पिशवी आढळली. पिशवीत रोख रक्कमेसह शाळेच्या फीची पावतीही होती. त्या पावतीच्या आधारे त्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला.
चौकशीअंती एजाज मुनीर खान यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून संपूर्ण ₹१२,५०० रक्कम त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. ही रक्कम त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे समोर आले.

हरवलेले पैसे परत मिळाल्यानंतर एजाज खान आणि त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्यांनी महाराष्ट्र पोलीसांचे तसेच पोलीस हवालदार संतोष सूर्यवंशी यांचे मनापासून आभार मानले.

पोलीस हवालदार सूर्यवंशी यांच्या या कृतीमुळे पोलीस दलाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon