रेल्वे प्रशासनाचा निर्ढावलेपणा चव्हाट्यावर; साडीच्या झोळीत आजींना नेले हॉस्पिटलमध्ये

रेल्वे प्रशासनाचा निर्ढावलेपणा चव्हाट्यावर; साडीच्या झोळीत आजींना नेले हॉस्पिटलमध्ये

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – माणुसकीला काळिमा फासणारी आणि रेल्वे प्रशासनाचा निर्ढावलेपणा चव्हाट्यावर आणणारी एक अतिशय संतापजनक घटना कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली आहे. ज्या स्टेशनवरुन रोज लाखो प्रवासी प्रवास करतात, तिथल्या यंत्रणेकडे एका वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यासाठी साधी एक स्ट्रेचरही नसावी, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते? मदतीसाठी एक तास आक्रोश करूनही रेल्वेचे अधिकारी किंवा पोलीस फिरकलेच नाहीत. शेवटी एका साडीची झोळी करून या माउलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.कल्याण रेल्वे स्टेशनवर घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि आपत्कालीन सुविधांचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

पुण्यातील सुनंदा दंडवते या वयोवृद्ध महिला उपचारासाठी कल्याणमध्ये आल्या होत्या. उपचार आटोपून त्या पुण्याला परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकात गाडीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याच वेळी त्यांना अचानक फिट आली आणि त्या बेशुद्ध होऊन खाली पडल्या. आजूबाजूला असलेल्या प्रवाशांनी त्यांना सावरले आणि तातडीने मदतीसाठी धावपळ सुरू केली. मात्र, याच क्षणापासून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा खेळ सुरू झाला.

बेशुद्ध पडलेल्या आजींना तातडीने उपचारांची गरज होती. तिथल्या प्रवाशांनी आरपीएफ (RPF), जीआरपी (GRP) आणि स्टेशन व्यवस्थापनाकडे मदतीसाठी धाव घेतली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे तब्बल १ तास एकही रेल्वे कर्मचारी किंवा पोलीस तिथे मदतीसाठी फिरकला नाही.

स्टेशनवर आपत्कालीन सुविधांचा दावा केला जात असला, तरी या वृद्ध महिलेला नेण्यासाठी एक साधा स्ट्रेचरदेखील उपलब्ध झाला नाही. रेल्वेच्या या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली.

वेळ हाताबाहेर जात असल्याचे पाहून रोहित दंडवते आणि आर्यन हुले या दोन तरुण प्रवाशांनी धाडस दाखवले. त्यांनी महिलेच्या बॅगेतील साडी काढली आणि त्या साडीची झोळी करून सुनंदा दंडवते यांना त्यात झोपवले. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून त्यांना उचलून प्लॅटफॉर्म क्रमांक १ पर्यंत आणण्यात आले आणि तिथून स्टेशनबाहेर नेले. साडीत गुंडाळून एका वृद्ध महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आल्याने रेल्वे प्रशासनाचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत.

महिलेला जवळच्याच एका क्लिनिकमध्ये नेण्यात आले, मात्र तिथेही सुरुवातीला डॉक्टर उपलब्ध नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. अखेर डॉक्टरांनी तपासून सुनंदा दंडवते यांना मृत घोषित केले. वेळेवर मदत मिळाली असती आणि स्ट्रेचरसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध असती, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते, अशा भावना उपस्थित प्रवाशांनी व्यक्त केल्या. काही दिवसांपूर्वीच 108 ॲम्बुलन्स उशिरा आल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, कल्याण स्टेशनवर पुन्हा हा प्रकार घडल्याने रेल्वेच्या आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon