कात्रज घाटात भीषण अपघात; एसटी-रिक्षा समोरासमोर धडक, चालकाचा जागीच मृत्यू

कात्रज घाटात भीषण अपघात; एसटी-रिक्षा समोरासमोर धडक, चालकाचा जागीच मृत्यू

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे : कात्रज घाट परिसरात गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडून रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. कात्रज घाट बोगदा ओलांडल्यानंतर पुण्याकडे येताना एका वळणावर एसटी बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) एमएच 10 डीटी 2697 क्रमांकाची बस स्वारगेटहून सांगली जिल्ह्यातील विटा दिशेने जात होती. त्याचवेळी एमएच 12 जीएस 9695 क्रमांकाची रिक्षा खेड शिवापूरहून स्वारगेटकडे येत होती. घाटातील वळणावर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात रिक्षा चालक हनुमंत रमेश हंगरगे (वय ४२, रा. सुखसागर नगर, बिबेवाडी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रिक्षातील अन्य प्रवासी राजेश इंगवले (४८, गोकुळ नगर, कात्रज-कोंढवा रोड), दशरथ निरगुडे (४३, अप्पर बिबेवाडी) आणि शहाजी लक्ष्मण शिवदे (४१, अप्पर इंदिरानगर, बिबेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य हाती घेतले. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती; मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, एसटी बस चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय ५३, रा. शेडगेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कात्रज घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon