रमाबाई कॉलनीतील अंडागळे उद्यानात गैरप्रकारांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रमाबाई कॉलनीतील अंडागळे उद्यानात गैरप्रकारांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : घाटकोपर पूर्वेतील रमाबाई कॉलनीमधील अंडागळे उद्यानात मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आणि महिलांची छेडछाड यांसारख्या प्रकारांत वाढ झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, उद्यान ‘असामाजिक घटकांचा अड्डा’ बनल्याची तक्रार पुढे आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागांतर्गत येणारे हे उद्यान परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे एकमेव ठिकाण मानले जाते. सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच निवांत वेळ घालवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येथे येतात. मात्र, सायंकाळनंतर येथे असामाजिक घटकांचा वावर वाढत असल्याने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात येणे अवघड झाले आहे, अशी तक्रार करण्यात येत आहे.

स्थानिक समाजसेवक लक्ष्मण (बाळू) जाधव यांनी सांगितले की, उद्यानात काही जण उघडपणे मद्यपान करतात, तसेच अमली पदार्थांचे सेवनही केले जाते. काही जण महिलांची छेडछाड करीत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. याबाबत पंतनगर पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

या संदर्भात अनेक तक्रारपत्रांच्या प्रती सहायक पोलिस आयुक्त आणि परिमंडळ ७ चे पोलिस उपायुक्त यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. तसेच एका अपंग युवतीसह काही नागरिकांनी स्वतंत्रपणे तक्रारी नोंदविल्या असून, दामू अंडागळे यांनी संबंधितांविरोधात गुन्हाही नोंदविला आहे.

दरम्यान, पंतनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, लवकरात लवकर कडक कारवाई करून उद्यान असामाजिक घटकांपासून मुक्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon