रबाळे एमआयडीसी मध्ये एमटीएनएल केबल चोरीचा पर्दाफाश; दोघे अटकेत, १० जण फरार

सुधाकर नाडार / प्रतिनिधी

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी परिसरात एमटीएनएल केबल चोरीच्या प्रकाराचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आणखी दहा जण फरार असल्याचे समोर आले आहे. पहाटेच्या सुमारास सुरू असलेला हा प्रकार पत्रकारांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.
नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई परिसरात एमटीएनएल केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाब समोर येत आहे. “पोलीस महानगर”च्या अहवालानुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात सातत्याने कारवाई होत असून आतापर्यंत २० हून अधिक टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १०० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रबाळे एमआयडीसी, रबाळे टेलिफोन एक्सचेंज आणि रेल्वे स्थानकासमोर केबल चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रिपोर्टर टीम घटनास्थळी दाखल झाली. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास काही आरोपी जेसीबी मशीनच्या सहाय्याने खड्डा खोदून एमटीएनएल केबल कापत असल्याचे दिसून आले.
या वेळी तात्काळ ११२ वर संपर्क साधून नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दोन आरोपींना पकडण्यात यश मिळवले, तर जेसीबी चालकासह अन्य आरोपी फरार झाले.
२५ लाखांची जेसीबी सह मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून जेसीबी मशीन, एमटीएनएल केबल, कटर, जॅकेटसह इतर साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे १ लाख रुपयांचे केबल, ५० हजारांचे कटर आणि २५ लाख रुपये किमतीची जेसी (MH 48 E 0263) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी वाशी येथील एमटीएनएल कार्यालयाचे जनरल मॅनेजर यादनाथ बंसोडे यांच्या तक्रारीवरून रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात FIR क्रमांक १५०/२०२६ नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२), ३२४, ३(५) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य सूत्रधारासह १० जण फरार
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख भांडुप येथील गुड्डू उर्फ निग्रो आणि कुर्ल्यातील मलिक अशी झाली आहे. चौकशीत ऐरोली येथील अमन सिंग हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले असून तो सध्या फरार आहे. याशिवाय साहू, राजू, मुन्ना, हाफिज मलिक (भंगारवाला) आणि त्याचे तीन साथीदार अशा एकूण दहा आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गालवे, पोलीस उपनिरीक्षक सचिन आणि पथक करत आहे.