‘सीबीआय मध्ये नोकरी’च्या आमिषाने लाखोंची फसवणूक; तोतया ‘आयपीएस’ला महिलांचा चोप
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर : सीबीआयमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगार महिलांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या तोतया ‘आयपीएस’ अधिकाऱ्याचा भांडाफोड झाला असून संतप्त महिलांनी त्याला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
राजू पट्टेकर असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवत असे. अंगात पोलीस वर्दी, कमरेला पिस्तुल आणि हातात बनावट ओळखपत्र घेऊन तो विश्वास संपादन करत होता. ‘सीबीआय किंवा पोलीस दलात नोकरी लावतो’ असे सांगून त्याने अनेक महिलांकडून प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपये उकळल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
दरम्यान, पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने तसेच आरोपीकडून टाळाटाळ सुरू असल्याने महिलांना संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलांनी एकत्र येत आरोपीला पकडण्याचा सापळा रचला. ठरल्याप्रमाणे त्याला गाठून विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्याला भररस्त्यात चांगलाच धडा शिकवला.
यानंतर महिलांनी आरोपीला फरफटत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडून बनावट पोलीस वर्दी, खोटे ओळखपत्र, लेटरपॅड तसेच खेळण्यातील पिस्तुल जप्त करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.