‘गुड टच-बॅड टच’च्या नावाखाली खंडणी; पोलिसांसह तिघांवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुड टच-बॅड टच’चे धडे देण्याच्या निमित्ताने शाळेत गेलेल्या पोलिसांनीच एका महिला प्राचार्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल ७ लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील महिला कर्मचारी सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. हिंगे या सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणूनही परिचित आहेत. हे तिघे एका स्थानिक शाळेत विद्यार्थ्यांना ‘गुड टच-बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते.
मात्र, याच संधीचा गैरफायदा घेत त्यांनी शाळेच्या महिला प्राचार्याला जाळ्यात ओढले. पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी देत त्यांनी प्राचार्यांवर मानसिक दबाव आणला. बदनामी आणि कारवाईच्या भीतीने घाबरलेल्या प्राचार्यांनी अखेर आरोपींच्या मागणीनुसार ७ लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच तातडीने चौकशी सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.