नौपाड्यात ७ वर्षांच्या मुलीवर ४५ वर्षीय बांधकाम मजुराचा बलात्कार; नराधम मजुराला बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे शहराच्या नौपाडा परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या ठिकाणी अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी ४५ वर्षीय मजुराला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली असून पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद केले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकाम स्थळावर पीडित मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करतात. आरोपी देखील त्याच ठिकाणी काम करत होता. सोमवारी संध्याकाळी संधी साधून आरोपीने या सात वर्षांच्या चिमुरडीचे लैंगिक शोषण केले. या धक्कादायक प्रसंगामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने रडत रडत आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला.
आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून पालकांनी विलंब न करता नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बांधकाम स्थळावरील महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.