सिग्नल फेल झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीत अडथळा; कसाऱ्याला जाणारी ट्रेन कल्याणमध्येच थांबली, प्रवासी संतापले
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या कल्याण स्थानकावर लोकल सेवा खोळंबली असल्याचे समोर आले आहे. ४:१४ ची कसारा ट्रेन अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ कल्याण स्थानकावर उभी होती अशी माहिती समोर आली आहे. सिग्नल फेल झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
समोर आलेल्या माहितीनुसार, ४:१४ कसाऱ्याकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी राहिली. ही ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्यामुळे प्रवासी ताटकळले.ट्रेन उभी असल्यामुळे अनेक प्रवासी डब्याच्या बाहेर आल्याचेही समोर आले आहे. आंबिवली–टिटवाळा दरम्यान दुपारी सुमारे ३:३५ वाजता सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकल सेवा कोलमडली.
कल्याणवरून कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाड्या अर्धा तास लेट झाल्या. कारण टिटवाळा ते आंबिवली दरम्यान लोकल गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे समोर आले. या सर्व गाड्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. त्यामुळे या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. सध्या रेल्वे प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्तीचे काम करण्यात आले असून लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आले.