‘काळ्या जादू’च्या बहाण्याने अत्याचार; नवी मुंबईतील भोंदूबाबाचा पर्दाफाश
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई : राज्यात भोंदूबाबांच्या गैरकृत्यांची मालिका सुरू असतानाच नवी मुंबईतील कळंबोली परिसरात कार्यरत असलेल्या एका भोंदूबाबाचा विकृत चेहरा उघडकीस आला आहे. अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या स्वयंघोषित बाबाने ‘काळी जादू काढून टाकतो’ या बहाण्याने महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बाबाजान हा धार्मिक व तत्त्वज्ञानात्मक भाषणे देत नागरिकांचा विश्वास संपादन करत असे. अल्लाचे महत्त्व पटवून देत तो लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर वैयक्तिक, आर्थिक, वैवाहिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून विशेषतः महिलांना एकट्याने भेटण्यासाठी बोलावले जात होते.
खालापूर येथे एका विवाहित महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर सांताक्रुझ येथे आई आणि मुलीवर बलात्कार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणांत आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली होती.
तपासात असेही समोर आले की, ‘काळी जादू काढण्याच्या’ विधीच्या नावाखाली आरोपी महिलांना मध्यरात्री बोलावत असे. त्यांना अंगावरील वस्त्रे काढून ‘पूजा’ करण्यास भाग पाडले जात होते. विरोध केल्यास जादूटोण्याची भीती आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे पीडितांनी तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, कळंबोली परिसरात त्याच्या घरी वाढत्या गर्दीमुळे स्थानिक नागरिकांनी त्याला घर खाली करण्यास भाग पाडले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपीने कुटुंबासह पळ काढल्याचेही उघड झाले आहे. अनेक वर्षांपासून तो अशा प्रकारे लोकांची फसवणूक करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात मुस्लिम सत्यशोधक मंडळ पुढाकार घेत पीडित महिलांना पोलिसांत तक्रार करण्यास प्रोत्साहित करत आहे. सर्व धर्मांमध्ये भोंदूबाबा ही एक घातक प्रवृत्ती असल्याचे सांगत अशा व्यक्तींना राजकीय आश्रय देऊ नये, अशी मागणीही संस्थेने केली आहे.
सद्यस्थितीत दोन महिलांनी पुढे येत तक्रार दिली असली, तरी आणखी अनेक महिलांनी या भोंदूबाबाच्या कृत्यांचा बळी ठरल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.