अंजली दमानिया यांचा नवा आणि हादरवून टाकणारा गौप्यस्फोट!
थेट अशोक खरातचा मोबाइल सीडीआर आला बाहेर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १७ वेळा केला होता कॉल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर दररोज नवनवे आणि धक्कादायक असे खुलासे होत आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याच प्रकरणी एक नवा आणि हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला. यावेळी अंजली दमानिया यांनी थेट अशोक खरातच्या मोबाइलचा सीडीआर म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड बाहेर काढला आहे. यामध्ये दमानियांनी असा दावा केला आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल १७ वेळा खरातला कॉल केला होता. त्यामुळे खरात प्रकरणात आता एकनाथ शिंदेनी देखील राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहेत.
कुठल्याही विषयावर लढायला लागल्यावर माझ्याकडे बरीचशी माहिती येते. तसाच काहीसा प्रकार आता झाला आहे. अशोक खरातचं प्रकरण महाराष्ट्रात सुरू आहे. त्याची बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते आहे आणि ती माध्यमांपर्यंत देते आहे. पण काही कारणामुळे मी चंदीगड येथे आले आहे एका लग्नासाठी. रविवारपर्यंत मी परत येणार नव्हते म्हणून मला वाटलं की, मी ही माहिती लोकांपर्यंत पोहचवावी.
मला एक सीडीआरची कॉपी आली. ती व्हॉट्सअपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही. आताच्या घटकेला जेव्हा ही माहिती आली तेव्हा तात्काळ, मी ती पोलीस महासंचालक महाराष्ट्र, मुख्यमंत्र्यांना दिली आणि एसआयटीच्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे परवाच पाठवली. काल दिवसभरात जी माहिती होती ती मी थोडीशी संकलित केली. आताच्या घटकेला माझ्याकडे जी धक्कादायक माहिती आहे ती अशी आहे की, रुपाली चाकणकर म्हणायच्या की, ‘अशोक खरात माझे गुरु आहेत. खरातांबाबत मला बाकी काही विशेष माहीत नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वैगरे वैगरे.
‘मात्र, आता जी माहिती येते आहे ती अतिशय धक्कादायक आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण १७७ कॉल्स हे अशोक खरातला झाले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर.. दोन दिवस झाले आपण त्यांच्याबाबत बरंचसं ऐकतो आहोत. त्यांचे २३६ कॉल्स हे अशोक खरातांना झाले आहेत. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे फक्त आपण फोटो आणि व्हिडिओ बघितले होते.
आताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल १७ कॉल्स हे अशोक खरातला नॉर्मल सेलफोनवरून झाले होते. व्हॉट्सअप आणि इतर किती झाले हे मला माहीत नाही. पण १७ कॉल पैकी १० इनकमिंग आणि ७ आऊटगोईंग कॉल्स होते. ज्यामध्ये सगळ्यात जास्त.. म्हणजे २१ मिनिटं यांच्या संभाषण झालं.’