एटीएस अधिकाऱ्याचे सोंग; ‘संपत्ती पडताळणी’च्या नावाखाली निवृत्त वृद्धाची ₹१.५४ कोटींनी फसवणूक
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई : स्वतःला एटीएस अधिकारी असल्याचे भासवून अटक व पोलीस कारवाईची भीती दाखवत ‘संपत्ती पडताळणी’च्या नावाखाली एका ६२ वर्षीय निवृत्त नागरिकाची तब्बल ₹१.५४ कोटींची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.
कळंबोली, पनवेल येथील विनायक गोविंद देशमुख (६२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात आरोपींनी विविध मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधला. व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल तसेच ‘Signal’ अॅपच्या माध्यमातून संवाद साधत स्वतःला एटीएस अधिकारी असल्याचे भासवण्यात आले. यावेळी आरोपींनी रिझर्व्ह बँकेचे बनावट पत्र पाठवून विश्वास संपादन केला.
त्यानंतर अटक व चौकशीची भीती दाखवत कारवाई टाळण्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखवण्यात आले. ‘संपत्ती पडताळणी’च्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकारात तक्रारदाराकडून एकूण ₹१,५४,९८,००० इतकी रक्कम उकळण्यात आली.
१ एप्रिल रोजी तक्रारदार सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर गुन्हा क्रमांक १८/२०२६ नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ अंतर्गत कलम ६६(डी) लागू करण्यात आले आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कानगुडे व पोलीस निरीक्षक विशाल पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, स्वतःला सरकारी अधिकारी सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, आरबीआय, एटीएस किंवा सीबीआयच्या नावाने येणाऱ्या कॉल्सची खातरजमा करावी, तसेच कोणत्याही दबावाखाली ऑनलाईन व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.