मानलेल्या बहिणीच्या छेडछाडीच्या रागातून मुंब्र्यात गोळीबार; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
पोलीस महानगर नेटवर्क
मुंब्रा : मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीतील कैलास नगर परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयन शिवानंदन नायर (वय ५१) याने त्याच्या मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या संशयावरून अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख यांच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
गोळीबारात तिघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. उर्वरित दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपीला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या घटनेमागील नेमके कारण व इतर तपशील पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.