काळाचौकी पोलिसांची झटपट कारवाई; ४८ तासांत मंदिर चोरीचा उलगडा, ₹१.७५ कोटींचा मुद्देमाल जप्त
सुधाकर नाडार / प्रतिनिधी
मुंबई : जैन मंदिरातील सोन्याचे दागिने व हिरे असा तब्बल ₹१.७५ कोटींचा ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला काळाचौकी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक करून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केला. काटेकोर तपास, तांत्रिक विश्लेषण आणि वेगवान कारवाईच्या जोरावर पोलिसांनी ही मोठी चोरी अल्पावधीत उघडकीस आणली.
३० मार्च २०२६ रोजी पहाटे २.३० ते ५ वाजण्याच्या सुमारास परिसरातील एका सोसायटीमधील जैन मंदिरात ही चोरी झाली होती. अज्ञात इसमाने मंदिरातील सोन्याचे दागिने आणि हिरे चोरून नेल्याची घटना उघड होताच काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सुमारे २०० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली. या फुटेजच्या आधारे आरोपीची हालचाल व ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. तपासात आरोपी पूर्वी संबंधित मंदिरात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला मंदिराच्या रचनेची व सुरक्षेची पूर्ण माहिती असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
तांत्रिक तपास व लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशात पळाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांचे विशेष पथक तत्काळ मध्य प्रदेशात रवाना झाले. तेथे आरोपी आपल्या नातेवाईकाच्या घराच्या छतावर लपून बसलेला असताना पोलिसांनी त्याला गाठले. अटक टाळण्यासाठी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी शिताफीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जितेंद्र उर्फ जितन उर्फ बंटी उर्फ पंडित नगाईच (वय ३४, भिंड – मध्य प्रदेश) असे असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर यापूर्वी आर्म अॅक्टसह लूटमारीचे एकूण १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने व हिरे असा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून त्यामुळे तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काळाचौकी पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून पूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.