नाशिकमध्ये ११ वर्षीय विद्यार्थिनीला स्कूल व्हॅन चालकाकडून बॅड टच; पोलिसात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिकमध्ये एका ११ वर्षीय विद्यार्थिनीशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध बालकांचं लैंगिक संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड परिसरातील पीडित मुलगी जून २०२५ पासून अभिनव शाळेत जाण्यासाठी संशयित आरोपीच्या स्कूल व्हॅनचा वापर करत होती. शाळेत ने-आण करताना आरोपी मुलींशी गैरवर्तन करत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या मुलीनं ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
गंगापूर रोड परिसरातील पीडित विद्यार्थिनी गेल्या ६ वर्षांपासून इतर मुला-मुलींसोबत स्कूल व्हॅन व्हॅनमधून अभिनव शाळा येथे ये-जा करत होती. १८ मार्च रोजी रात्री जेवणाच्या वेळी वडिलांनी मुलीला आवाज दिला असता ती रडू लागली. वडिलांनी विचारपूस केल्यानंतर तिनं व्हॅन चालक तिच्याशी गैरवर्तन करत असल्याचं सांगितलं. तसंच गेल्या एका वर्षापासून इतर मुला-मुलींशीही तो अशाच प्रकारे वागत असल्याचा आरोप तिनं केला. मुलीनं दिलेल्या माहितीनंतर पालकांनी इतर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता, आणखी काही मुलींनाही अशाच प्रकारचा त्रास झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली आणि प्रकरण सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोहोचलं.
विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुरेश पाटील याच्याविरुद्ध बालकांचं लैंगिक संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर विद्यार्थिनींनाही त्रास झाला आहे का? याचा तपास सुरू असून संबंधितांचे जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिली.