महिला सक्षमीकरणातील प्रभावी नेतृत्वाला दाद; वैशाली पाटील यांना ‘कर्तृत्ववान पुरस्कार’, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची धुरा

Spread the love

महिला सक्षमीकरणातील प्रभावी नेतृत्वाला दाद; वैशाली पाटील यांना ‘कर्तृत्ववान पुरस्कार’, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची धुरा

पुणे : महिला सक्षमीकरण क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई पाटील यांना ‘कर्तृत्ववान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. अभिलाषा फाउंडेशन आयोजित ‘उंच माझा झोका’ या प्रेरणादायी कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात त्यांनी जज/ज्यूरी/परीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडत दुहेरी भूमिका यशस्वीपणे निभावली.

कुसुमवत्सल्य फाउंडेशन ट्रस्टच्या अध्यक्षा असलेल्या पाटील यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. परीक्षक म्हणून काम करताना त्यांनी सहभागींच्या कलागुणांचे सूक्ष्म मूल्यमापन करत न्याय्य निर्णय दिल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

दरम्यान, सौ. पाटील यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. केंद्रीय समितीने हा निर्णय घेतला आहे.

पाटील या सध्या पुणे जिल्हा महिला मॉल प्रकल्प समन्वयक तसेच स्वराष्ट्र लोकशाही आघाडी मध्ये कार्यरत आहेत. याशिवाय ‘कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल क्वीन’ हा किताबही त्यांच्या नावावर असून महाराष्ट्र पर्यटन राज्याध्यक्ष आणि उमेद महिला मॉलच्या मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या विविध उपक्रम राबवत आहेत.

पुरस्कार स्वीकारताना त्यांनी अभिलाषा फाउंडेशनचे आभार मानत, अशा उपक्रमांमुळे महिलांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन अभिलाषा संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सुषमा वाळुंज यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon