नवरी नटली, सुपारी फुटली, पण हनिमूनच्या आधीच नवरी सटकली

Spread the love

नवरी नटली, सुपारी फुटली, पण हनिमूनच्या आधीच नवरी सटकली

लग्नाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; कोपरगाव पोलिसांकडून हायप्रोफाइल टोळीचा पर्दाफाश

पोलीस महानगर नेटवर्क

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या हायप्रोफाइल टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन महिलांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

रवंदा येथील एका तरुणाला नाशिकमधील मध्यस्थांमार्फत लग्नाचे आमिष दाखवण्यात आले होते. २१ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बोलणी करून संबंधित तरुणाचा विवाह लावण्यात आला. मात्र, लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत नवरीने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान नाशिकमधील आडगाव नाका परिसरातून कशीष सुकदेव भालेराव, नम्रता सुकदेव भालेराव आणि भूमी किरण निकम या तिघींना अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी संगनमताने खोटे विवाह लावून तरुणांना लुटल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी २.२९ लाख रुपये रोख रक्कम तसेच काही दागिने जप्त केले आहेत. दरम्यान, या टोळीने अशाच प्रकारे इतर अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांनी विवाह जुळवताना संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon