कल्याण डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींच्या प्रकरणावरून भाजपा आणि शिवसेना आमनेसामने; शिंदेसेनेवर भाजप आक्रामक

Spread the love

कल्याण डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींच्या प्रकरणावरून भाजपा आणि शिवसेना आमनेसामने; शिंदेसेनेवर भाजप आक्रामक

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याण डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींच्या प्रकरणावरून आता भाजपा आणि शिवसेना हे पालिकेतील सत्तारुढ पक्षच आमनेसामने आले आहेत. या इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देण्याबाबत शिंदे गटाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर भाजपाने जोरदार प्रहार केला आहे. केवळ श्रेयासाठी चमकेशगिरी करणाऱ्यांनी या प्रकरणी शासन निर्णय म्हणजेच जीआर काढून दाखवावा, असे थेट आव्हान भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५ बेकायदा इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून येथील हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. या संदर्भात सोमवारी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी नगरविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत एक बैठक घेतली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही बैठक झाल्याचे सांगत, या इमारतीमधील नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, ही घोषणा होताच भाजपाने आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी यावर बोलताना सांगितले की, या रहिवाशांच्या पाठीशी भाजपा सुरुवातीपासून ठामपणे उभी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. आता काही लोक केवळ श्रेय घेण्यासाठी बैठकांचे सत्र राबवून चमकेशगिरी करत आहेत.

खरोखरच नागरिकांना दिलासा द्यायचा असेल, तर केवळ पोकळ घोषणा न करता उल्हासनगरच्या धर्तीवर या इमारतींसाठी अधिकृत जीआर काढून दाखवावा, असे आव्हान म्हात्रे यांनी दिले आहे. वारंवार होणाऱ्या बैठका आणि आश्वासनांमुळे नागरिक हवालदिल झाले असून, त्यांना ठोस निर्णयाची प्रतीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon