पुण्यात घातपाताचा मोठा डाव उधळत पोलिसांनी आरोपीला पिस्तूलसह ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – कात्रज परिसरात मोठा अनर्थ घडवण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करत संभाव्य घातपाताचा डाव उधळून लावला आहे. गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतूस घेऊन संशयास्पद हालचाली करत फिरत असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. या कारवाईमुळे कात्रज घाट परिसरात घडू शकणारी गंभीर घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लक्ष्मण दगडू कचरे (२२) असे आहे. तो सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी वेल्हे पोलीस ठाण्यात त्याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे तो पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक नियमित गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कात्रज येथील गंधर्व लॉन्ससमोरून घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण पिस्तूल घेऊन फिरत आहे. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीकडून हा कट्टा कुठून आणला, तसेच तो नेमका कोणत्या उद्देशाने फिरत होता? याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.