ऐन उन्हाळ्यात कंत्राटदाराचे कंत्राट संपल्यामुळे केडीएमसीटीची वातानुकूलित सेवा बंद; नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी कल्याण- डोंबिवलीमधील प्रवासी केडीएमटीच्या वातानुकूलित सेवेच्या बसगाड्यांमधून प्रवास करण्यासाठी गर्दी करत असताना ऐन उन्हाळ्यात केडीएमसीटीची वातानुकूलित सेवा बंद झाली आहे. वातानुकुलित सेवा चालवणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट संपल्यामुळे शहरातील आठ मार्गांवरील ही सेवा बंद झाली आहे. डोंबिवली स्थानक बाजीप्रभू चौक ते एमआयडीसी निवासी वसाहतीपर्यंतच्या वातानुकूलित बससेवेला सर्वाधिक पसंती होती. ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी केडीएमटीच्या अर्थसंकल्पामध्ये नव्या वातानुकूलित ई-बसगाड्यांची घोषणा होत असतानाच शहरातील ही सेवा ठप्प झाली आहे.
मुंबई महानगर प्रदेशात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून वातानुकूलित सार्वजनिक वाहतुकीला सर्वाधिक पसंती मिळत आहे. रेल्वेच्या वातानुकूलित लोकल गाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी वाढत आहे. तर ठाणे, नवी मुंबई, एसटी महामंडळाकडूनही वातानुकूलित सेवांकडे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे केडीएमटीकडूनही वातानुकूलित बसगाड्यांची सेवा वाढवण्याची मागणी होत आहे. केडीएमसी प्राधिकरणांकडून जेमतेम आठ मार्गांवर वातानुकूलित सेवा दिली जात आहे. परंतु या वातानुकूलित सेवा देण्यासाठी नियुक्त कंत्राटदाराचे कंत्राट आठ महिन्यांपूर्वी संपल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून कल्याण-डोंबिवलीतील सर्व मार्गांवरील एसी बससेवा बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयामध्ये परिवहन विभागाचा सुमारे २२६ कोटींचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेमध्ये सादर करण्यात आला. यावेळी १०० नव्या बसगाड्यांच्या माध्यमातून कल्याण- डोंबिवलीकरांना सुविधांची घोषणा करण्यात आली. परंतु त्याचवेळी शहरातील केडीएमटीच्या वातानुकूलित सेवा ठप्प झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने नागरिकांमध्ये सक्षम असंतोष निर्माण झाला आहे.
प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधी निवडून आल्याने शहरातील या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वातानुकूलित सेवा तात्काळ सुरू कराव्यात. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना एसीबस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करण्याची मागणी डोंबिवली एमआयडीसीतील राजू नलावडे यांनी केली आहे.
डोंबिवली स्थानकाबाहेरून बाजीप्रभू चौकातून एमआयडीसी निवासी भागात जाणाऱ्या वातानुकूलित बस सेवेला या भागातील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने या बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत होती. परंतु शनिवारी सकाळपासून ही बस बंद झाल्याचे कळल्याने नागरिक हवालदिल झाले. त्यामुळे प्रवाशांकडून परिवहन प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर अधिकाऱ्यांकडून कंत्राट संपल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील दोन ते तीन महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण उन्हाळ्यात प्रवाशांना सामान्य बसमधून प्रवास करावा लागण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.