रेल्वे पार्किंग कंत्राटदारावर पेव्हर ब्लॉकने जीवघेणा हल्ला; ‘पीडी’सह सहा जणांविरुद्ध गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : जुन्या वैमनस्यातून रेल्वे वाहनतळाचे कंत्राट घेणाऱ्या व्यावसायिकावर सहा जणांच्या टोळीने पेव्हर ब्लॉकने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना कल्याणमधील आधारवाडी परिसरात घडली. या प्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रशांत देशमुख उर्फ ‘पीडी’ याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी विशाल नायडू (३६) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या डोक्याला नऊ टाके पडले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल नायडू हे कल्याण पश्चिमेतील गायकरपाडा परिसरात कुटुंबासह राहतात आणि रेल्वे वाहनतळाचे कंत्राट घेतात. त्यांच्या तक्रारीवरून प्रशांत देशमुख उर्फ पीडी, प्रतिक ठाकरे, शुभम नाडे, सुजय कदम, अक्षय तेजी तसेच दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, नायडू आणि प्रशांत देशमुख यांची ओळख सुमारे सहा वर्षांपासून आहे. मात्र २०२२ मध्ये देशमुखचा मित्र प्रतिक ठाकरे याने नायडू यांच्या मित्रावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर दोघांमधील संबंध बिघडले होते. दरम्यान, होळीच्या दिवशी रात्री देशमुख यांनी नायडू यांना फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली आणि तातडीने भेटण्याचा आग्रह धरला. मात्र नायडू यांनी नंतर भेटू असे सांगितल्याने देशमुख यांनी फोन बंद केला.
यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास नायडू हे चायनिज पदार्थ घेण्यासाठी आधारवाडी सर्कल परिसरात गेले असता संदीप चायनिज सेंटरजवळ आरोपींची टोळी उभी होती. प्रतिक ठाकरे याने नायडू यांना थांबवून शिवीगाळ केली आणि जवळच पडलेला पेव्हर ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात मारला. त्यावेळी शुभम नाडे याने हातातील चाकू दाखवत मध्ये पडणाऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर इतर आरोपींनीही नायडू यांना बेदम मारहाण केली.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी नायडू यांनी पत्नीच्या मदतीने रुग्णालयात दाखल होत पोलिसांत तक्रार दिली. या घटनेची पोलीस दलात उच्चस्तरावर दखल घेण्यात आल्याची चर्चा असून पुढील तपास पोलीस करत आहेत.