मकोका गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीला अटक; पुणे गुन्हे शाखेची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : तीन वर्षांपासून फरार असलेल्या मकोका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात पुणे शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने ही कारवाई करत बबलू संतोष चव्हाण (वय २५, रा. संजय पार्क, एअरपोर्ट रोड, लोहगाव) याला ताब्यात घेतले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संजय आढारी आणि विनोद महाजन यांना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित आरोपी संजय पार्क परिसरात येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.
यानुसार मदीना मशिद परिसर, संजय पार्क, लोहगाव येथे पोलिसांनी कारवाई करत आरोपी बबलू संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर आरोपी मकोका गुन्ह्यातील प्रकरणात मागील तीन वर्षांपासून फरार होता. या अटकेमुळे संबंधित गुन्ह्याच्या तपासाला गती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.