दीड महिन्यांच्या शोधानंतर जीएसटी अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
बीड : वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधव यांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याला अखेर बीड पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल ४० दिवस फरार असलेला फाटे पुणे येथील वाघोली परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला.
१६ जानेवारी २०२६ रोजी सचिन जाधव हे कर्तव्यावर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी मांजरसुंबा घाटातील कपिलधारवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर जाधव यांच्या पत्नी मयुरी जाधव यांनी वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले. कार्यालयीन कामकाजात अपमानास्पद वागणूक, अतिरिक्त पदभाराचा गैरवापर आणि काही विशिष्ट कंपन्यांच्या कथित बेकायदेशीर कामांसाठी दबाव टाकण्यात येत असल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले.
या जबाबानंतर २३ जानेवारी रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर फाटे फरार झाला होता. अटक टाळण्यासाठी त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला; मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने तो फेटाळला. आरोपी अटकेत येत नसल्याने पोलीस प्रशासनावर टीका होत होती.
दरम्यान, आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी २५ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. प्रसारमाध्यमांनी प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने पोलिसांवर दबाव वाढला. अखेर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणातून फाटे पुण्यात असल्याची माहिती मिळताच वाघोलीत छापा टाकून त्याला अटक करण्यात आली.
या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सहभागी होते. प्रदीप फाटेच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी गंभीर बाबी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.