कल्याण–डोंबिवलीत स्वच्छतेचा महाअभियान ४ हजार स्वयंसेवक, १ हजार कर्मचारी मैदानात; ६४ टनांहून अधिक कचरा संकलित
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : शहर स्वच्छ व सुंदर राखण्याच्या उद्देशाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महापालिका हद्दीत शनिवारी (१ मार्च) विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला लोकप्रतिनिधी, पोलीस, महापालिका अधिकारी-कर्मचारी तसेच हजारो स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कल्याण पश्चिमेत महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील आणि पालिका सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता केली. डोंबिवली पूर्वेत महापालिका कार्यालयानजीक उपमहापौर राहुल दामले व इतर सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली १०० पोलीस कर्मचाऱ्यांनीही मोहिमेत सहभाग नोंदवला.
महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छता अधिकारी-कर्मचारी, प्रतिष्ठानचे ‘श्री सदस्य’ तसेच नगरसेवक मैदानात उतरले होते. आमदार राजेश मोरे आणि सुलभाताई गायकवाड यांनीही पालिका सदस्यांसह प्रत्यक्ष सहभाग घेत मोहिमेला बळ दिले.
या एकदिवसीय अभियानात शहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचरा, धूळ व माती साफ करून घंटागाडी व डंपरद्वारे संकलन करण्यात आले. यावेळी १७,५८० किलो ओला कचरा आणि ४६,९९६ किलो सुका कचरा असा एकूण ६४ टनांहून अधिक कचरा जमा करण्यात आला. या मोहिमेसाठी प्रतिष्ठानचे सुमारे ४,००० स्वयंसेवक आणि महापालिकेचे १,००० कर्मचारी सहभागी झाले होते.
आपले शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, घरगुती कचऱ्याचे ओला-सुका विलगीकरण करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी केले.